- शहराध्यक्षांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता..
- विरोधक संधीची वाट पाहतोय; कार्यकर्त्यांमधून नाराजी…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ जानेवारी २०२६) :- सातव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी बुधवारी शहरातील एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे पक्षात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
“भारतीय जनता पक्षाकडून मला विचारणा होत होती, हवे ते पद मिळत होते, तरीही मी अजितदादांशी एकनिष्ठ राहिलो,” असे सांगत, “यापुढे महापालिकेची निवडणूक लढायची नाही. आमदारकीसाठी दादांनी विचार केला तर ठीक, अन्यथा राजकारणातून निवृत्ती घेईन,” असे सूचक विधान बहल यांनी केले.
दरम्यान, सोमवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित ३७ नगरसेवकांची बैठक घेत “आता तरी तोंड उघडा, चुकीच्या कामांविरोधात आक्रमक व्हा,” असा संताप व्यक्त केला होता. महापालिका निवडणूक पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर आक्रमक टीका करूनही राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही; अवघे ३७ नगरसेवक निवडून आले.
ही निवडणूक शहराध्यक्ष बहल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असताना, पराभवानंतर त्यांनी पक्षसंघटन मजबूत करण्याऐवजी निवृत्तीची भाषा केल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
नगरसेवक, महापौर आणि शहराध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवलेल्या बहल यांची ही भूमिका विरोधात बसण्याच्या टप्प्यावर आल्यावर बदलल्याची चर्चा आहे.
दरम्यान विरोधक संधीची वाट पाहत असल्याची कुजबुज असून, अशा वक्तव्यांमुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला शहरात पुन्हा घरघर लागण्याची भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.















