संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी–चिंचवड (दि. २१ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी सुरू केलेली जप्ती मोहीम शहरात वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
आजपासून (दि. २१) पासून शहरभर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे थकबाकीदारांमध्ये नव्हे, तर वेळेवर कर भरणाऱ्या अनेक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि उपायुक्त पंकज पाटील यांनी कठोर कारवाईचे आदेश दिला आहे. मात्र, नोटिसा वेळेवर न मिळणे, थकबाकी रकमेतील तफावत, तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या मध्यमवर्गीय व ज्येष्ठ नागरिकांवर थेट जप्ती व नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई अन्यायकारक असल्याची टीका होत आहे.
महापालिकेने आतापर्यंत ३५ मालमत्ता जप्त केल्या असून १३३ नळ कनेक्शन खंडित करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे अनेक कुटुंबांचा पाणीपुरवठा खंडित होऊन दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करण्याचा इशारा देण्यात आल्याने गोपनीयतेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेने टप्प्याटप्प्याने सवलती, हप्ते पद्धत, तसेच तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.











