- प्रकल्पाची दोन वर्षांत होणार उभारणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २८ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन (सुधार) प्रकल्पास अखेर केंद्र व राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. दोन्ही सरकारांकडून प्रत्येकी १३१ कोटी ४५ लाख रुपये, असा एकूण २६२ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून, उर्वरित तितकाच निधी महापालिका स्वतः उचलणार आहे. नगर विकास विभागाने सोमवार (दि. २७) रोजी या निर्णयाला औपचारिक मंजुरी दिली.
एकूण ५२६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प निघोजे ते च-होली या १८.५० किलोमीटर अंतरावर नदीच्या पिंपरी-चिंचवड हद्दीतील काठावर राबविण्यात येणार आहे. त्यात चिखलीतील रिव्हर रेसिडन्सी येथे ४० एमएलडी आणि २० एमएलडी क्षमतेची दोन सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे (एसटीपी) उभारण्यात येतील. नाल्यांमधून नदीत मिसळणारे सांडपाणी या केंद्रांकडे वळवून प्रक्रिया करूनच नदीत सोडले जाईल.
नदीकाठ सुशोभिकरणासाठी देशी वृक्षारोपण, हिरवळ, उद्याने, जॉगिंग ट्रॅक, पादचारी मार्ग आणि विसर्जन घाट विकसित केले जाणार आहेत. या उपक्रमामुळे नदीचे प्रदूषण आणि अतिक्रमण कमी होऊन आळंदीतील भाविकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होईल.
महापालिकेचा डीपीआर २० जून २०२३ रोजी तयार झाला असून, अमृत २.० योजनेतून मंजुरी मिळाली आहे. निधी तीन टप्प्यांत (२०%, ४०%, ४०%) देण्यात येणार असून, प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. शासनाची मंजुरी मिळाल्याने महापालिका आता निविदा प्रक्रियेची तयारी करत आहे, अशी माहिती मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.













