- दोन दिवसांत २५६५ किऑक्स, ३७६ लाकडी फ्लेक्स आणि १७६ लोखंडी बॅनर जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २८ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाच्या मार्फत शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर अवैध जाहिरातींवर कारवाई करण्यात आली. ह, क, ग आणि अ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागांनी संयुक्तरीत्या सलग दोन दिवस ही मोहीम राबवली.
या कारवाईत सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी आदी भागांत रस्त्याच्या कडेला, मुख्य चौकात आणि विजेच्या खांबांवर लावण्यात आलेले २५६५ किऑक्स, ३७६ लाकडी फ्लेक्स आणि १७६ लोखंडी बॅनर हटवून जप्त करण्यात आले. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन, वाढदिवस आणि ऑफर जाहिरातींमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली.
ही मोहीम उपायुक्त राजेश आगळे आणि आकाश चिन्ह विभागाचे प्रशासन अधिकारी ग्यानचंद भाट यांच्या आदेशानुसार, परवाना निरीक्षक कालिदास शेळके यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. यावेळी लिपीक कौशल नाणेकर, विकी नवगिरे, प्रदीप गायकवाड, अधीक्षक राजू कांबळे, अतिक्रमण निरीक्षक प्रकाश माने आणि मनिष जगताप यांच्या पथकांनी कारवाई केली.
महापालिका पोलिस दल, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ४५ जवान, १६ मजूर आणि अतिक्रमण विभागाची वाहने यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. सर्व जप्त केलेले फ्लेक्स, बॅनर आणि किऑक्स नेहरूनगर येथील गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले आहेत.













