न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २८ ऑक्टोबर २०२५) :- निगडी भक्ती शक्ती चौकात मेट्रोचे काम सुरू असून, या कामासाठी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून नेहरूनगरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी स्थलांतरित (शिफ्ट) करावी लागणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हे काम ३० ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे.
जलवाहिनी स्थलांतरित करण्याच्या कामासाठी, सदर जलवाहिनीवरून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या नेहरूनगर, संत तुकारामनगर, महेशनगर, गंगानगर, वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी तसेच चिखली येथील हरगुडे वस्ती, पवार वस्ती, कुदळवाडी, जाधववाडी इत्यादी भागातील ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार (३१ ऑक्टोबर २०२५) रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल.
नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी काटकसरीने वापरून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
निगडी परिसरातील मेट्रो कामाशी संबंधित जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना होणारा तात्पुरता गैरसोय टाळण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. तरी नागरिकांनी सहकार्य करावे.
— प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका













