न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २८ ऑक्टोबर २०२५) :-दारू पिऊन वाहन चालविण्यामुळे अपघातांची शक्यता वाढते, हे लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून नियमितपणे ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ विरोधात विशेष मोहिम राबविली जाते.
या मोहिमेत जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान एकूण २९८४ वाहनचालकांवर कारवाई करून न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान दि. २२ जुलै २०२५ रोजी हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणीदरम्यान दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी मोटारवाहन न्यायालय, पुणे यांनी संक्षिप्त खटला क्र. १७०१७२/२०२५ मध्ये आरोपीस रु. १०,०००/- द्रव्यदंड आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम २३ अन्वये १००० प्रती हँडबील छापून वाहतूक सिग्नलवर वाहनचालकांना वाटप करण्याची शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास १० दिवसांचा साधा कारावास देण्याचे आदेश दिले.
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधातील ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त मा. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.













