- अग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईची तयारी..
- तळवडे अग्निशमन विभागाचा इशारा; व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ५ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक वसाहती आणि रहिवासी भागांमध्ये गेल्या काही वर्षांत आगीच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक ठरली आहे. वारंवार जनजागृती आणि मॉकड्रिलसारखे उपक्रम राबवूनही अनेक व्यावसायिक तसेच सोसायट्यांकडून अग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची तयारी सुरू केली आहे.
चिखली आणि तळवडे परिसरात हजारो लघुउद्योगांमध्ये ज्वलनशील पदार्थांचा वापर होत असून, अग्निशमन यंत्रणा कार्यरत ठेवण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तळवडे अग्निशमन केंद्राचे उपअधिकारी बालाजी वैद्य यांनी सांगितले, “नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. व्यवसायाचे नुकसान टाळण्यासाठी अग्निशमन साधने कार्यान्वित करावीत.”
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनीही व्यावसायिकांना आवाहन केले की, “कारवाई टाळण्यासाठी नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन साधने वापरणे आवश्यक आहे.”
रंगकाम, रासायनिक प्रक्रिया, वेल्डिंग, हार्डवेअर, ऑइल, थिनर, लाकूड, कागद, अन्नप्रक्रिया आणि हॉटेल उद्योग यांसारख्या व्यवसायांसाठी कार्यरत अग्निशमन यंत्रणा ठेवणे बंधनकारक असल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे.













