न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने, महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १४ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२५ ही मुदत देण्यात आली आहे. या काळात नागरिकांकडून प्रारूप मतदार यादीवर येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह अशा क्षेत्रीय कार्यालयानिहाय अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकृत अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.
नियुक्तीबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत. प्रारूप मतदार यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारणे, आलेल्या हरकती व सूचनांची नोंद स्वतंत्र नोंदवहीत ठेवणे, हरकत किंवा सूचना दाखल केल्याची संबंधितांना पावती देणे, राज्य निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेश-निर्देशानुसार कामकाज करणे आदी कामाची जबाबदारी हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.
सदर कर्मचाऱ्यांनी हे कामकाज स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, महापालिकेचे सहायक नगररचनाकार प्रशांत शिंपी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, सहाय्यक आयुक्त राजीव घुले, किरणकुमार मोरे, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, प्रशासन अधिकारी सरीता मारणे, संगीता घोडेकर-बांगर व कार्यालय अधीक्षक रमेश यादव या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली करावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.











