- डॉ. बाबा कांबळे यांच्या आंदोलनाला यश; रस्ता झाला मोकळा, नागरिकांनी व्यक्त केला आनंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ नोव्हेंबर २०२५) :- मोरवाडी परिसरात महानगरपालिकेकडून चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेले डिव्हायडर आणि अतिविस्तारीत फूटपाथामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कष्टकरी जनता आघाडी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
या आंदोलनाची दखल घेत महानगरपालिकेने १२ नोव्हेंबर रोजी सकाळी संयुक्त पाहणी केली. यामध्ये महापालिका अधिकारी, वाहतूक पोलिस अधिकारी, डॉ. बाबा कांबळे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. पाहणीनंतर चुकीचे डिव्हायडर हटवणे आणि फूटपाथचा अवाजवी विस्तार कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महानगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करत डिव्हायडर हटवले आणि फूटपाथ योग्य प्रमाणात कमी केला. यामुळे रस्ता पूर्ववत रुंद झाला असून वाहतुकीला दिलासा मिळाला आहे.
डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, “चुकीच्या डिव्हायडर आणि फूटपाथमुळे झालेल्या भ्रष्टाचारावर आता पायबंद बसला आहे. हा कष्टकरी जनतेचा विजय आहे.”
या निर्णयामुळे रिक्षा चालक, फेरीवाले आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून अनेकांनी डॉ. कांबळे यांचे आभार मानले आहेत.












