- निष्काळजीपणामुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघे जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. ०५ जुलै २०२६) :- तळेगाव एमआयडीसी परिसरातील शाफलर कंपनीत ९ जून रोजी झालेल्या कार्बन डायऑक्साइड (CO₂) गॅस दुर्घटनेप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सात जणांसह इतर जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पिटमध्ये पुरेसे व्हेंटिलेशन, आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग, प्रशिक्षित कर्मचारी, आवश्यक सुरक्षा साहित्य व बचाव पथकाची व्यवस्था न करता फायर सप्रेशन सिस्टिमचे काम सुरू ठेवण्यात आले. तसेच सुरक्षा प्रक्रियेचे पालन न केल्याने जुने CO₂ सिलिंडर बदलताना अपघात झाला. या दुर्घटनेत वैभव थोरात (२४) व गौरीशंकर शर्मा (३८) यांचा मृत्यू झाला, तर तीन कर्मचारी जखमी झाले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहेत.
















