- २१ दिवसांची रजा संपल्यानंतर कारागृहात हजर न राहिल्याने भारतीय न्याय संहिता कलम २६२ अंतर्गत कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०५ जुलै २०२६) :- छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहातील शिक्षा बंदी किरण विलास भोसले याच्याविरुद्ध चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष कारागृह महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार भोसले याला २१ दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याची कारागृहातून मुक्तता करण्यात आली होती. रजेदरम्यान त्याने नाणेकरवाडी येथे वास्तव्यास राहण्याबाबत हमीपत्र व जामीन दिला होता. मात्र, ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपूर्वी कारागृहात हजर राहणे आवश्यक असतानाही तो परतला नाही.
शासनाच्या अधिसूचनेनुसार आणि मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या अहवालाच्या आधारे कारागृह शिपाई रामेश्वर गंगाराम पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ जुलै रोजी रात्री ९.०८ वाजता चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोते करीत आहेत.
















