- केप्री बिल्डरविरोधात कारवाईची मागणी…
- नगरसेविका ऐश्वर्या तरस यांची घटनास्थळी पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ०५ जुलै २०२६) :- रावेत येथील सर्व्हे क्रमांक ७८ परिसरात नैसर्गिक नाला बंदिस्त करून बुजविल्याचा आरोप केप्री बिल्डरवर करण्यात आला आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह विस्कळीत होऊन शेजारील सोसायटीचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मुसळधार पावसानंतर सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली असून परिसरातील रस्ताही खचल्याची गंभीर घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधित बिल्डरला आवश्यक सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांची अंमलबजावणी न झाल्याने सद्यस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या घटनेची दखल घेत नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी रविवारी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत महापालिका आयुक्तांकडे या प्रकरणात तातडीने व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, बाधित सोसायटीतील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण आणि नियमांचे उल्लंघन करून करण्यात येणारे बांधकाम नागरिकांच्या जीवित व मालमत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही करण्यात येत आहे.
दरम्यान या प्रकरणाबाबत संबंधित बिल्डरची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
















