- तब्बल ५८ जणांना परवानगी नाकारली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शस्त्रांचा निष्काळजी वापर आणि गुन्हेगारी माहिती लपविणाऱ्या परवानाधारकांवर मोठी कारवाई करत दोन व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. तसेच नव्या शस्त्र परवान्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी तब्बल ५८ व्यक्तींना परवाने नाकारण्यात आले आहेत.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत मयूर गुलाब सोनवणे यांनी स्वतःच्या घरी रिव्हॉल्वर हाताळताना निष्काळजीपणाने फायर झाल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानुसार त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात आला होता.
दुसऱ्या घटनेत चिखली हद्दीतील प्रविण सुरेश लुक्कर यांनी शस्त्र परवाना मिळविताना प्रतिज्ञापत्रात फक्त एकच गुन्हा नमूद करून इतर दोन गुन्हे आणि एक क्रिमिनल केसची माहिती लपविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांचाही परवाना रद्द करण्यात आला.
यापूर्वीही संतोष पवार, संतोष कदम, दिनेश सिंग आणि गणपत जगताप या चार परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले होते. अशा प्रकारे चालू वर्षात एकूण सहा परवाने रद्द झाले आहेत.
दरम्यान, ऑक्टोबर–नोव्हेंबर २०२५ मध्ये प्राप्त अर्जांपैकी ४१ जणांना तर यापूर्वी १७ जणांना परवाना नाकारण्यात आला असून, २०२५ मध्ये एकूण ५८ व्यक्तींना नव्या शस्त्र परवान्यांना नकार देण्यात आला आहे. ही कारवाई कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आयुक्त चौबे यांनी घेतलेला कठोर आणि महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.











