न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२५) :- मोशी कचरा डेपो परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून उत्सर्जित होणाऱ्या धुरातील घातक रसायनांचे योग्य परीक्षण होत नसल्याचे आढळल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रकल्पाच्या धुरातून डायॉक्सिन आणि फ्युरॉनसारखे मानवाच्या आरोग्यास हानीकारक घटक बाहेर पडण्याचा धोका असल्याचे मंडळाने नमूद केले आहे.
मंडळाच्या निरीक्षणानुसार चिमणीतून बाहेर पडणाऱ्या सर्व रसायनांचे दररोजचे परीक्षण अत्यावश्यक आहे. मात्र ते अपेक्षित पातळीवर न झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगत मंडळाने इन्सिनरेशन प्रकल्पाला तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रीय हरित लवादाकडून देशातील विविध वेस्ट टू एनergy प्रकल्पांची तपशीलवार माहिती मागवण्यात आली असून, मोशी प्रकल्पाचाही यात समावेश आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, “प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या धुराचे ऑनलाईन मॉनिटरिंग आम्ही सातत्याने करत आहोत. हरित लवादाच्या निर्देशांनुसार सर्व नोंदी तात्काळ संबंधित यंत्रणांना पाठवण्यात आल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवश्यक माहिती सादर केली आहे.”


















