न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२५):- पिंपरी परिसरात चायनीज नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेशनगर, पावर हाऊसजवळील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये ही कारवाई करण्यात आली. शासनाने प्लॅस्टिक, नायलॉन व सिंथेटिक मांजाच्या वापरावर बंदी घातलेली असताना, आरोपीकडे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित मांजा साठवून विक्रीसाठी ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
याप्रकरणी धिरज विशाल उल्लारे (वय १९, रा. गणेशनगर, पिंपरीगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून सुमारे ३६ हजार रुपये किमतीचा चायनीज नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून, सध्या त्याला अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणी गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकात कार्यरत पोलीस हवालदार किरण अर्जुन जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पक्षी व नागरिकांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता लक्षात घेता, अशा प्रतिबंधित मांजाविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी सांगितले.
प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलिसांकडून करण्यात येत आहे.












