- प्रभाग क्रमांक 25 ताथवडे-वाकड-पुनावळेतील कार्यकर्ते आक्रमक..
- भाजपच्या इच्छुकांनी फडकावलयं बंडाचं निशाण…
- आयात उमेदवारीला तीव्र विरोध; पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२५) :- आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाकड परिसरातील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, अन्य पक्षांतील नेत्यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध करत प्रभाग क्रमांक २५ मधून बंडखोरीचे संकेत देण्यात आले आहेत. माजी नगरसेवक विनायक गायकवाड, भाजप शहर उपाध्यक्ष विशाल कलाटे, राम वाकडकर, भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष चेतन भुजबळ, महिला मोर्चाच्या प्रदेश पदाधिकारी भारती विनोदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
वाकड येथील स्थानिक नेते राहुल कलाटे व अन्य बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाला आमचा ठाम विरोध असून, पक्षाने स्थानिक व निष्ठावान कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार शंकर जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडे याबाबत विनंती करण्यात आली असून, मागणी मान्य न झाल्यास अधिकृत उमेदवारांचे काम करणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
कार्यकर्त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या संघटन वाढीसाठी आम्ही अविरत मेहनत घेतली आहे. राहुल कलाटे हे गत चार विधानसभा निवडणुकांत विविध पक्षातुन लढले आणि पराभूत झाले. आज भाजपच उरलेला पक्ष आहे. अशा वेळी आयात उमेदवार स्वीकारणे योग्य नाही. ताथवडे-वाकड-पुनावळे परिसरात बाहेरून आलेले उमेदवार चालणार नसून, आमच्यातील सक्षम इच्छुक उमेदवारांना संधी दिल्यास आम्ही ताकदीने काम करू, असा दावा त्यांनी केला.
गत विधानसभा निवडणुकीत या प्रभागातून सर्वाधिक मतदान झाले होते. मात्र, अपेक्षित विकासकामे न झाल्याने यंदा परिवर्तन अटळ आहे, असेही कार्यकर्त्यांनी सांगितले. राहुल कलाटेंच्या पक्षप्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांच्या पूर्वीच्या वर्तनामुळे भाजपची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपचे अंतर्गत राजकारण तापले असून, पक्षश्रेष्ठी या बंडखोरीवर काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.












