- पतीच्या डोक्यात घातली लोखंडी सळई..
- पत्नीच्या प्रियकरासह तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सुसगाव (दि. १० नोव्हेंबर २०२६) :- पत्नीला मारहाण का केली, असा जाब विचारण्यासाठी पत्नीचा प्रियकर दोन साथीदारांसह थेट पतीच्या घरासमोर पोहोचला. त्यानंतर झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी एका आरोपीने रस्त्यावर पडलेली लोखंडी सळई उचलून पतीच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात पती जखमी झाला असून, त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. ही घटना सुसगाव येथील पारखेवस्ती परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू हिम्मत गवई (वय २६, व्यवसाय ड्रायव्हर) यांचा पत्नी आम्रपाली यांच्यासोबत ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर काही वेळाने आम्रपाली यांचा प्रियकर विठ्ठल वांडेकर हा त्याच्या दोन साथीदारांसह करण चांदेरे यांच्या इमारतीसमोर, गणपती मंदिराजवळ आला.
यावेळी आरोपींनी बाळू गवई यांना ‘तू आम्रपालीला का मारले?’ असा जाब विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या दोन साथीदारांनीही शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान, विठ्ठल वांडेकर याने तेथे पडलेली लोखंडी सळई उचलून बाळू यांच्यावर वार केला. त्यांनी खाली वाकून वार चुकविण्याचा प्रयत्न केला; मात्र सळई त्यांच्या उजव्या कानाजवळ डोक्याला लागल्याने ते जखमी झाले. ‘आम्रपालीला मारले तर तुला पाहून घेईन,’ अशी धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी बाळू गवई यांनी ९ नोव्हेंबर रोजी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विठ्ठल वांडेकर व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारणे करीत आहेत.

















