- सफाई कामगारांना दिवाळी भेटवस्तू देत फाउंडेशनने जपली माणुसकीची नाती..
- संस्थापक अध्यक्ष संतोष सौंदणकर यांचा स्तुत्य पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १० नोव्हेंबर २०२६) :- दिवाळी हा आनंद, उत्साह आणि एकमेकांमध्ये आनंद वाटून घेण्याचा सण. मात्र, आपल्या शहराची स्वच्छता राखण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या सफाई कामगारांच्या आयुष्यातही दिवाळीचा आनंद फुलावा, या सामाजिक भावनेतून रमामंगल सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील सफाई कामगारांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी कामगारांना दिवाळी भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.
रमामंगल सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष सौंदणकर म्हणाले, “दिवाळी हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि प्रकाश घेऊन येणारा सण आहे. मात्र, आपल्या शहराची स्वच्छता राखण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सफाई कामगारांचाही हा आनंदाचा सण तितक्याच उत्साहात साजरा व्हावा, अशी आमची भावना आहे. शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये या कामगारांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच आपण स्वच्छ परिसरात राहू शकतो. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. या उपक्रमातून केवळ भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले नाही, तर शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या कष्टकरी हातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. समाजाच्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर शहरात राहता यावे, यासाठी सफाई कामगार ऊन, पाऊस आणि सण-उत्सवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या श्रमांचा सन्मान व्हावा, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू, कष्टकरी आणि दुर्लक्षित घटकांसाठी असे उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील. माणुसकी जपणे आणि आनंद वाटणे हाच आमच्या संस्थेचा खरा उद्देश आहे.”
कार्यक्रमास वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, थेरगाव रुग्णालयाचे प्रमुख डॉ. शंकर मोसलगी, आरोग्य निरीक्षक मुकेश जगताप, प्रभारी आरोग्य निरीक्षक प्रकाश खलसे, दीपक सरोदे, अशोक नवले, सुभाष मालुसरे, कार्याध्यक्ष सुमित कांबळे, उपाध्यक्ष गणेश ओगले, खजिनदार संतोष मोरजकर, फिरोज खान, सचिन घाडगे, अश्विन मायनाळे, महादेव सुतार, रुबान शेख, महेश कुंभार, समीर कुरळे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, मुकादम आणि घंटागाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमामंगल सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे सफाई कामगारांची दिवाळी अधिक आनंददायी झाली. सामाजिक जाणीव, कृतज्ञता आणि माणुसकीचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

















