- अनुप मोरे फाउंडेशनतर्फे मिठाई वाटप…
- अंध व्यक्ती, स्मशानभूमीतील कर्मचारी आणि महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 09 नोव्हेंबर 2026) :- दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या सामाजिक भावनेतून अनुप मोरे फाउंडेशनच्या वतीने निगडी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरात मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनुप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात सेक्टर २२ मधील अंध व्यक्ती, निगडी अमरधाम स्मशानभूमीतील कर्मचारी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले.
दिवसरात्र समाजासाठी सेवा देणाऱ्या आणि अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या घटकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा या उपक्रमामागील उद्देश होता. यावेळी मिठाईसोबत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. उपस्थितांसाठी चहा आणि नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.
या उपक्रमात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर, राजेंद्र लक्ष्मण काळभोर, राजू शेख, हैदर शेख, सलीम मुकरताल, नाना गिसरे, रवी सवणे, महेश मगर, पप्पू हतागळे, विकास कांबळे, जयदेव भुवड, जगदीश चौधरी, फुआराम चौधरी, रफिक शेख, अविनाश साळवे, अविनाश वाघमारे आणि अकम भाई शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
समाजातील प्रत्येक घटकाला सणाच्या आनंदात सहभागी करून घेणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला.

















