- महायुतीतील घटक पक्षाच्या शहराध्यक्षांचा गौप्य्स्फोट…
- भाजपच्या ‘शंभरपार’ च्या घोषणेमुळे राजकीय वातावरण चिघळले…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा पत्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ डिसेंबर २०२५) :- महापालिकेत १२८ पैकी तब्बल १२५ जागांवर विजय मिळवू, असा मोठा दावा भाजपकडून करण्यात आल्यानंतर या दाव्यांवर आता संशय व्यक्त होत असून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे निवडणूकप्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार) चे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी ईव्हीएमबाबत धक्कादायक आरोप करत भाजपवर थेट निशाणा साधला आहे.
बहल यांनी शनिवारी (दि. २७) सांगितले की, काही माजी नगरसेवकांना पक्षात घेताना “ईव्हीएममध्ये दोन ते अडीच हजार मते आपोआप मिळतील” असे आश्वासन दिले जात असल्याचे समजले आहे. राज्यात सत्तेत सहभागी असूनही राष्ट्रवादीकडून असा गंभीर आरोप सार्वजनिकपणे केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पिंपरी-चिंचवडची निवडणूक स्वबळावर लढवत आहेत.
भाजपकडे विधानसभेत आणि विधानपरिषदेत मिळून चार आमदार असताना, प्रत्येक आमदार २५ नगरसेवक जिंकवून आणेल, अशा हिशेबावर १२५ जागांचा नारा दिला जात आहे, असा बहल यांचा प्रश्नार्थक सूर असून “भाजपने ईव्हीएम सेट केली आहे का, हे त्यांनाच माहीत,” अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
यापुढे बहल म्हणाले, “दोन ते अडीच हजार मते आपोआप मिळतील, तुम्ही या… बाकी मदत करतो” असे आश्वासन नेमक्या कोणत्या आधारावर दिले जात आहे, याचे उत्तर भाजप देणार का?
राष्ट्रवादी (अजित पवार) चे अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने ‘डोळे झाकून’ विजयाचा दावा केला जात असला, तरी हा सगळा अतिआत्मविश्वास आणि घमेंड असल्याची टीका त्यांनी केली. “शंभर जागा मिळविणेसुद्धा भाजपला अवघड जाईल,” असे बहल यांनी स्पष्ट केले.
या सर्व आरोपांमुळे भाजपच्या घोषणांवर ईव्हीएम संशयाची छाया पडली असून, आगामी निवडणुकीत ईव्हीएमपासून विजयाच्या दाव्यांपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.












