न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २७ रहाटणी येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला उमेदवार अर्चनाताई विनोद तापकीर आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेली पंकजा मुंडे यांची जाहीर सभा नागरिकांसह महिलांमध्ये विशेष उत्साह निर्माण करणारी ठरली. सभेला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
सभेदरम्यान महिलांशी थेट संवाद साधत महिला सक्षमीकरण, सामाजिक सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला. महिलांनी संघटित होऊन विकासाच्या प्रवाहात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पंकजाताई यांनी केले.
अर्चनाताई तापकीर यांनी महिलांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका मांडत, प्रभागातील महिलांसाठी आवश्यक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या साध्या, आपुलकीच्या संवादशैलीमुळे महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या जाहीर सभेमुळे अर्चनाताई तापकीर यांच्या उमेदवारीला भक्कम पाठिंबा मिळत असून, प्रभागात भाजपच्या महिला नेतृत्वाचे पारडे जड झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. महिला सक्षमीकरण, विकास आणि सुरक्षित भविष्यासाठी कमळाला मतदान करा, असे आवाहन करण्यात आले आहे.












