- शब्द दादांचा, वादा तात्याचा; काळेवाडीत उभं राहणार शिवस्मारक!…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- काळेवाडी परिसरात अनेक वर्षांपासून एक ठळक प्रश्न जनतेच्या मनात सलत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आजतागायत उभे का राहिले नाही? शिवराय म्हणजे केवळ इतिहास नाही, ते मराठी अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि प्रेरणेचे प्रतीक आहेत. अशा महान राजाच्या स्मारकाचा अभाव हा केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नाही, तर मराठी अस्मितेचा अपमान असल्याची भावना आता तीव्र होत चालली आहे.
प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित केला, पण सत्ताधाऱ्यांकडून केवळ आश्वासनांची पोकळीच मिळाली. निवडणुका आल्या की शिवरायांचे नाव घेतले जाते, पण निवडणुका संपल्या की शिवराय विसरले जातात—असा कटू अनुभव काळेवाडीकरांनी घेतला आहे. मात्र यंदा परिस्थिती बदलताना दिसत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विकासाचे ठोस निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार यांनी स्वतः पुढाकार घेत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा ठाम शब्द दिला आहे. हा शब्द म्हणजे केवळ राजकीय घोषणा नसून, तो काळेवाडीकरांच्या भावनांना दिलेला शब्द आहे, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
या ऐतिहासिक निर्णयामागे प्रभाग क्रमांक २२ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मच्छिंद्र तात्या तापकीर यांची ठाम भूमिका आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. “शिवरायांचे स्मारक उभारणे हा माझ्यासाठी राजकीय मुद्दा नाही, तर अस्मितेचा प्रश्न आहे,” असे स्पष्ट मत मच्छिंद्र तात्या तापकीर यांनी मांडले आहे. प्रभागाच्या विकासासोबतच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे ते ठासून सांगतात.
उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिलेल्या शब्दामुळे काळेवाडीत आता आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. “शब्द दिला आहे, तर तो पूर्ण केला जाईल,” अशी अजितदादांची ओळख आहे. त्यामुळे शिवस्मारकाचा प्रश्न आता फक्त चर्चेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात उतरणार, अशी ठाम भावना नागरिकांमध्ये आहे.
या पार्श्वभूमीवर मच्छिंद्र तात्या तापकीर यांनी अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानले असून, “काळेवाडीतील प्रत्येक शिवप्रेमीच्या भावना समजून घेत स्मारक उभारण्याचा शब्द दिल्याबद्दल आम्ही सर्वजण ऋणी आहोत,” अशी भावना व्यक्त केली आहे. आज काळेवाडीला केवळ रस्ते, ड्रेनेज किंवा पाणीपुरवठ्यासह स्वाभिमान जपणारा विकास हवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे त्या स्वाभिमानाचे प्रतीक ठरणार आहे. पाठीशी दादा आणि मैदानात तात्या असल्याने, यंदा हा वादा पूर्ण होणारच असा ठाम विश्वास काळेवाडीकर व्यक्त करत आहेत.












