- केवळ आश्वासन नाही तर, प्रत्यक्ष कामांचा शब्द देते – मोनिकाताई नवनाथ नढे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी परिसरात विकासाचा मुद्दा निर्णायक ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत महिला उमेदवार मोनिकाताई नवनाथ नढे यांनी सहउमेदवार मच्छिंद्र तात्या तापकीर यांच्यासह ओंकार कॉलनी, गंगा कॉलनी, विजयनगर परिसर, नढेनगर येथे प्रचारादरम्यान मतदारांसमोर ठोस, स्पष्ट आणि वेळेत पूर्ण होणाऱ्या विकासकामांची जाहीर ग्वाही दिली आहे.
“निवडणूकपुरती आश्वासने देण्याऐवजी नागरिकांना प्रत्यक्षात दिसणारा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्यास आहे,” असे ठाम मत मांडत मोनिकाताई नढे यांनी विरोधकांच्या पोकळ घोषणांवर जोरदार टीका केली. काळेवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणीपुरवठा, ड्रेनेज समस्या, कचरा व्यवस्थापनाचा अभाव तसेच आरोग्य व शिक्षण सुविधांची कमतरता हे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नवीन जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्यांचे आधुनिकीकरण आणि नियमित पाणीपुरवठा ही प्राथमिकता असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सांडपाणी व ड्रेनेज व्यवस्था मजबूत करून पावसाळ्यात होणारे पाणी साचण्याचे संकट कायमचे दूर करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
रस्ते, फुटपाथ आणि स्ट्रीट लाइट्ससंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्य रस्त्यांसह अंतर्गत गल्ल्यांचे दर्जेदार काँक्रिटीकरण केले जाईल. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित फुटपाथ आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी प्रकाशयोजना उभारली जाईल.
आरोग्य सुविधांवर भर देताना अद्ययावत नागरी दवाखाना, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तपासणी शिबिरे, महिलांसाठी विशेष आरोग्य योजना आणि बालकांसाठी लसीकरण मोहिमा राबवण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. शिक्षण क्षेत्रात शाळांच्या सुविधा सुधारणा, डिजिटल शिक्षण आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीच्या योजना राबवण्यात येतील.
युवकांसाठी रोजगार, क्रीडांगणे, व्यायामशाळा व कौशल्य विकास केंद्रे, तसेच महिलांसाठी स्वयंसहायता गटांना आर्थिक पाठबळ देण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “माझ्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसचे मजबूत नेतृत्व आणि अजित पवार यांची विकासाभिमुख दृष्टी आहे. त्यामुळे दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला जाईल,” असा विश्वास मोनिकाताई नढे यांनी व्यक्त केला.
काळेवाडीत आता केवळ आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष कामांची अपेक्षा असून, ही अपेक्षा पूर्ण करण्याचा ठाम निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी व्यक्त केला आहे.












