- पुनर्वसनाच्या नावाखाली दादागिरी खपवून घेणार नाही – सुलभाताई उबाळे…
- सेक्टर २२ मधील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर..
- सुरक्षितता, वीज व पुनर्वसनाबाबत ठाम भूमिका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १३ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील सेक्टर २२ पत्राचाळीत राहणाऱ्या महिलांसाठी सार्वजनिक शौचालये नाहीत. पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारती धुळखात पडल्या असून, नागरिकांना तात्पुरत्या पत्राचाळीत राहावे लागत आहे. या पत्राचाळींमध्ये अस्वच्छता, घुशींचा उपद्रव, चोरी-मारामारीच्या घटना वाढल्या असून दारांना कडी-कोयंडा नसल्याने सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत मला या नागरिकांना न्याय द्यायचा आहे, असा ठाम विश्वास मा. नगरसेविका तथा शिवसेना उमेदवार सौ. सुलभाताई रामभाऊ उबाळे यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान मा. नगरसेविका तथा शिवसेनेच्या उमेदवार सुलभा उबाळे यांनी सेक्टर २२ मधील नागरिकांशी थेट संवाद साधला. सेक्टर २२ परिसरातील नागरिकांसह पत्राचाळीतील रहिवाशांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षितता वाढवली जाईल आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय दिला जाईल.
दुसरीकडे पुनर्वसनाचे आश्वासन दिले जात असताना प्रत्यक्षात नागरिकांची अवस्था दयनीय आहे. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमचा निकाली लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे अत्यंत टोकाची भूमिका घेऊन प्रश्न सोडवण्याची तयारी आहे. जोपर्यंत पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत पाठपुरावा सोडणार नाही.
सौ. सुलभाताई म्हणाल्या की, दारोदार प्रचारादरम्यान नागरिक यमुनानगरचे “गतवैभव पुन्हा आणा, तुम्हीच आमचे प्रतिनिधित्व करा,” अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
सेक्टर २२ मधील तीन क्रमांकाच्या इमारतींमध्ये आठवड्यातील चार दिवस वीजपुरवठा खंडित होत होता. यासाठी तीन लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. गरिब नागरिकांनी प्रत्येकी एक हजार रुपये देऊन सुमारे ८० हजार रुपये जमा केले. मात्र, उर्वरित रक्कम नसल्याने काम करण्यास नकार देण्यात आला. यानंतर मी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनास्थळी बोलावले. “गरिबांकडून पैसे मागणे अन्यायकारक आहे,” असे स्पष्ट केल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ केबल टाकून वीजपुरवठा सुरु केला. एवढ्या सहजतेने होणाऱ्या कामासाठी नागरिकांकडून पैसे उकळले गेले आणि ते परतही करण्यात आले नाहीत, अशी खंत उबाळे यांनी व्यक्त केली.
पुनर्वसनाच्या नावाखाली दादागिरी खपवून घेणार नाही – सुलभाताई उबाळे
पुनर्वसन प्रकल्पातील नागरिकांना दमदाटी, जबरदस्तीने सह्या घेणे व विरोध करणाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा ठाम इशारा शिवसेनेच्या उमेदवार सुलभाताई उबाळे यांनी दिला. “या जागेचे खरे मालक रहिवासीच आहेत. नागरिकांची स्पष्ट इच्छा असेल तेव्हाच येथे पुनर्वसन प्रकल्प होईल. तोपर्यंत कोणालाही कुदळ मारू देणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. नागरिकांना जितकी घरे हवी आहेत, तितकी घरे मिळावीत, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. अन्यथा येथे कोणाचीही दादागिरी चालणार नाही. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, अशी ग्वाही उबाळे यांनी निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांना दिली.












