न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १३ जानेवारी २०२६) :- गेली पाच वर्ष अखंडपणे सुरू असलेली भव्य दिव्य MPL क्रिकेट स्पर्धा यावर्षी देखील सिल्वर क्रिकेट अकॅडमी चिखली येथील स्टेडियमवर दैदिप्यमान स्वरुपात संपन्न झाली.
चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे व त्यांच्या उद्योजक संघटनेतील ऊद्योजकांनी ६ वर्षापूर्वी कंपनीचे मालक व त्यामधील कामगार यांच्यामधील दरी कमी करण्यासाठी क्रिकेट या खेळाचे माध्यम तयार करून भव्य अशी MPL क्रिकेट स्पर्धा सुरू केली. यामध्ये आत्तापर्यंत कंपन्यांच्या शेकडो कामगारांनी सहभाग घेतला होता.
यावर्षी दुसऱ्यांदा फक्त कंपन्यांचे मालक यांना एकत्र घेऊन भव्य अशी MPL क्रिकेट स्पर्धा 2026 सीजन 6 हे चाकण भोसरी MIDC उद्योजक संघटनेने आयोजित केली होती. यामध्ये 100 पेक्षा जास्त उद्योजकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी MPL कोअर कमिटीचे प्रमुख जयदेव अक्कलकोटे, मुख्य समन्वयक सी ए ऋषी खळदकर, चाकण MIDC उद्योजक संघटनेचे संचालक प्रवीण शिंदे, सचिव निवास माने, खजिनदार किसन गायकवाड, संचालक प्रशांत गोरे, उद्योजक पंकज ढवळे, सिद्धार्थ राणे, सुभाष गोळे, अभय सोनावणे, लक्ष्मण काळे, दिलीप देशमुख, कौस्तुभ मुरुडवार आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
10 व 11 जानेवारी 2026 रोजी चाललेल्या या स्पर्धा सिल्वर क्रिकेट अकॅडमी स्टेडियम चिखली येथे पार पडल्या. या स्पर्धेसाठी उद्योजकांना एकत्र घेऊन त्यांचे संघ तयार करण्यासाठी जवळपास 2 महिने दर गुरुवारी प्रत्येक उद्योजकाचा खेळ बघून त्याचे ग्रेडिंग करण्यात आले व त्यानंतर प्रत्येक संघामध्ये त्याच तोडीचे उद्योजक खेळाडू हे देण्यात आले त्यामुळे सहभागी सर्व संघ हे समतुल्य होते.
अतिशय चुरशीच्या झालेल्या या संपुर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष व सह्याद्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक यांच्या सह्याद्री अंत्रप्रिन्युअर्स संघाने विजेतेपद पटकावले. उद्योजक पंकज ढवळे यांच्या एस एम सी स्ट्रायकर्स यांना उपविजेते पद मिळाले व उद्योजक प्रशांत गोरे यांच्या सुदर्शन वॉरियर संघाला तिसऱ्या स्थानावरती समाधान मानावे लागले. स्पर्धा प्रत्यक्ष पाहण्यासाठी 2 दिवसात शेकडो उद्योजकांनी हजेरी लावली.
या स्पर्धेकरिता ॲडसन फर्निशिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, अभिजीत प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड, सुर्या इलेक्ट्रॉनिक्स, वेबलिंक सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड व एस एन पोटे कंस्ट्रक्शन कंपनी यांचे प्रायोजकत्व लाभले.
बक्षीस वितरण सोहळ्यासाठी जेष्ठ कामगार नेते यशवंतभाऊ भोसले, मराठा अंत्रप्रिन्युअर्स असोसिएशनचे विक्रम माने, महेंद्र यादव, सर्व प्रायोजक तसेच शेकडो उद्योजक उपस्थित होते.
पुढच्या वर्षी देखील यापेक्षा भव्य दिव्य अशी MPL क्रिकेट स्पर्धा भरून जास्तीत जास्त कंपन्यांच्या मालकांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणून उद्योजकता विकास साधु असा विश्वास चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी स्पर्धेच्या सांगता सोहळ्यात व्यक्त केला.












