- पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्वीप उपक्रमांतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम..
- महानगरपालिकेचा अनोखा उपक्रम…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१३ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरामध्ये विविध ठिकाणी एअर बलूनच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली मतदान जनजागृतीसाठी विविध स्वीप उपक्रम राबवण्यात येत आहे.
या अंतर्गत शहरामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, भक्ती शक्ती चौक, डांगे चौक थेरगाव, भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, रावेत येथील मुकाई चौक,पिंपळे गुरव येथील डायनॉसोर उद्यान,तळवडे चौक,च-होली अशा विविध ठिकाणी एअर बलूनच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली आहे. या बलूनवर मतदार जनजागृतीपर संदेश देण्यात आले असून येत्या १५ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रत्येक पात्र मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. एअर बलूनसारख्या नाविन्यपूर्ण माध्यमातून राबविण्यात आलेला उपक्रम नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण करत असून, जास्तीत जास्त मतदारांनी १५ जानेवारी रोजी मतदानाचा हक्क बजावावा.
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. एअर बलूनच्या माध्यमातून दिला जाणारा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज पोहोचत असून, प्रत्येक पात्र मतदाराने मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा.
– अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.












