- नवोदीत मतदार पहिल्यांदाच मतदान करणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये उत्सुकता व आनंद…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१३ जानेवारी २०२६) :- प्रत्येक मत हे लोकशाहीचे बळ आहे. मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकाने आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे,शिवाय सामाजिक बांधिलकीतून आपले कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांनाही मतदानासाठी प्रेरित करावे.भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होत असून या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली मतदान जनजागृतीसाठी स्वीप उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत निगडी येथील लाईट हाऊस येथे युवकांसाठी मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जनता संपर्क अधिकारी पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी लाईट हाऊसचे पूजा मोगरे, लखन रोकडे, अभिजित कांबळे, दिपाली वाघुळे, अक्षता घारे, लुईस शेळके, छवी राठोड यांच्यासह शेकडो विद्यार्थी, युवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मतदान जनजागृतीवर आधारित पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्याद्वारे प्रत्येक मताचे लोकशाहीमध्ये असणारे महत्त्व विशद करण्यात आले. युवकांनी टाळ्यांची साथ देत पथनाट्य सादरीकरण करणाऱ्या टीमचे कौतुक केले. त्यानंतर उपस्थितांना लोकशाहीमध्ये प्रत्येक मत हे अमूल्य असून त्याचे महत्त्व किती आहे, याबाबत युवकांना जनता संपर्क अधिकारी पुराणिक यांनी माहिती दिली. त्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित सर्व युवकांनी मतदानाची शपथ घेत येत्या महापालिका निवडणुकीत १००% मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.












