- भरारी पथकाने केली कारवाई..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१३ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. १२ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी काळेवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाची एसएसटी, एफएसटी, व्हीएसटी अशी विविध पथके महापालिका हद्दीत कार्यरत आहेत.
१२ जानेवारी रोजी रात्री १०.२३ वाजता आचारसंहिता कक्षाला रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर तातडीने राहुल निकम यांच्या नेतृत्वाखालील एफ.एस.टी. भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे एका गाडीमध्ये (क्र. एमएच १४ केए ६३३०) जवळपास १९ वॉशिंग मशीन असल्याचे आढळून आले आहे.











