एज्युवार्ता :- सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १४ जानेवारी २०२६) :- खगोलशास्त्रातील संशोधनासाठी शांतीस्वरूप भटनागर युवा शास्त्रज्ञ पुरस्काराने राष्ट्रपतींकडून गौरविण्यात आलेले श्रीक्षेत्र देहूचे सुपुत्र, खगोलशास्त्रज्ञ प्रा. सुहृद श्रीकांत मोरे यांना देहूतील सृजन फाऊंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्यावतीने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर यांच्या शुभहस्ते ‘सृजन सेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी युवा शास्त्रज्ञ मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, मुलांना सतत प्रश्न पडायला हवेत, प्रश्न पडणे हे शास्त्रज्ञ होण्याचे खरे लक्षण आहे असे प्रतिपादन केले.
खगोलशास्त्रज्ञ सुहृद मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपला जीवन प्रवास उलगडत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना साध्या व सोप्या भाषेत उत्तरे दिली.
या संवाद सत्रामध्ये देहू व पंचक्रोशीतून आलेल्या विविध शाळा सहभागी झाल्या होत्या. इ. सहावी, सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी आकाशगंगेची निर्मिती व उत्पत्ती, काॅस्माॅलाॅजी, कृष्णविवरे, प्रकाशवर्षाचे अंतर, दीर्घिका, तारे, गुरुत्वाकर्षण, शास्त्रज्ञांचा अभ्यास विषय आदी विषयांवर उत्साहाने, जिज्ञासेने, उत्स्फूर्तपणे व कुतूहलाने प्रश्न विचारले. युवा शास्त्रज्ञ मोरे सर व त्यांच्या समवेतच पुण्यातील आयुका संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या त्यांच्या पत्नी अनुप्रीता मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनात विज्ञानाबद्दल नवी प्रेरणा निर्माण केली.
या संवाद सत्रामध्ये देहूतील संत तुकाराम विद्यालय, संत जिजाबाई कन्या विद्यालय, जगदगुरु इंग्लिश मिडीयम स्कूल, मॉ. जगदंबा इंग्लिश मिडीयम स्कूल, तळवडे येथील राजा शिवछत्रपती विद्यालय, रुपीनगर येथील ज्ञानदीप विद्यालय, चिखली येथील श्री दादा महाराज नाटेकर पंचकोषाधारित विद्यालय गुरुकुल, जाधववाडी, चिखली येथील ज्ञानज्योती माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
याप्रसंगी पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त हभप शिवाजीमहाराज मोरे, माजी सरपंच मधुकर कंद, उद्योजक सुनील हगवणे, आदर्श शिक्षक श्रीकांत मोरे, आदर्श शिक्षिका आशाताई मोरे, संस्थेचे अध्यक्ष सुनिल कंद, संस्थेचे सल्लागार अँड. संजय भसे, उपप्राचार्या शैलजा स्वामी आदि मान्यवर उपस्थित होते.
सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. सहशिक्षिका वृषाली आढाव व विनिता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.












