- संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष…
सुरज करांडे, क्राईम रिपोर्टर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी उद्या गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी मतदान होत असून त्यापूर्वी आज शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ४२० इमारतींमध्ये २१३५ मतदान केंद्रे असून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका लावला असून संशयित, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
अवैध दारू, अमली पदार्थ, शस्त्रसाठा तसेच रोख रकमेच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस सतर्क आहेत.
आज शहरातील प्रमुख चौक, मतदान केंद्र परिसर, संवेदनशील भागांमध्ये पोलिस गस्त, नाकाबंदी व रूट मार्च वाढविण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी, हजारो पोलिस कर्मचारी, होमगार्ड, दंगल नियंत्रण पथके तैनात आहेत. नागरिकांनी कोणत्याही दबावाशिवाय निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.












