- सुट्टी न देणाऱ्या खासगी आस्थापनांवर कारवाईचा इशारा…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्या गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी जिल्ह्यात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तरीदेखील काही खासगी कंपन्या, औद्योगिक कारखाने व आस्थापनांकडून कामकाज सुरू ठेवले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा कामगार उपायुक्त कार्यालयाने दिला आहे.
मतदानाच्या दिवशी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांप्रमाणेच खासगी आस्थापनांनाही सुटी लागू आहे. विशेषतः औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, कारखाने, दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स, निवासी हॉटेल्स तसेच सेवा क्षेत्रातील संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुटी देणे बंधनकारक असल्याचे कामगार प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत संपूर्ण दिवसाची सुटी देणे शक्य नसल्यास संबंधित आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना किमान दोन ते तीन तासांची सवलत देऊन मतदान करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. कोणतीही कंपनी किंवा आस्थापना कर्मचाऱ्यांना सुटी न देता कामावर बोलावत असल्याचे आढळल्यास त्या व्यवस्थापनाविरोधात कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुटी नाकारली जात असल्यास त्यांनी अपर कामगार आयुक्त किंवा कामगार उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन कामगार उपायुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदान करावे, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.












