- मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत यंदा केवळ प्रभागनिहाय लढत न राहता नेतृत्वाच्या अस्तित्वाचीही कसोटी लागली आहे. विविध सात राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष स्वतः निवडणूक रिंगणात उतरल्याने या निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. अनुभवी नेतृत्व पुन्हा विश्वास संपादन करते की नव्या चेहऱ्यांना संधी मिळते, याचा फैसला मतदार करणार आहेत.
काही शहराध्यक्ष सहाव्यांदा, तर काही तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असून काहींसाठी ही पहिलीच निवडणूक आहे. माजी महापौर, सत्तारूढ व विरोधी बाकांवर काम केलेले नेते पुन्हा जनतेसमोर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मागील कार्यकाळातील कामगिरी, स्थानिक प्रश्नांवरील भूमिका आणि पक्षसंघटन कौशल्य यांची तुलना मतदारांकडून केली जात आहे.
या निवडणुकीत माजी महापौरांचीही लक्षणीय उपस्थिती आहे. वेगवेगळ्या पक्षांकडून सात माजी महापौर विविध प्रभागांतून मैदानात उतरले असून ‘अनुभव विरुद्ध बदल’ अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे काही उमेदवार पक्षबदल करून लढत असल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
यंदा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही प्रभागांत पती-पत्नी अशी जोडपी निवडणूक रिंगणात आहेत. काही ठिकाणी दोघेही एकाच पक्षाकडून, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या गटांतून लढत असल्याने स्थानिक पातळीवर उत्सुकता वाढली आहे. एकाच कुटुंबातील अनेक उमेदवार सभागृहात प्रवेश करणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
एकूणच शहराध्यक्षांची प्रतिष्ठा, माजी महापौरांचा अनुभव आणि कुटुंबीयांच्या लढती यामुळे यंदाची महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. या सर्व राजकीय समीकरणांचा निकाल शुक्रवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार असून, कोण नेतृत्व सभागृहात प्रभावी भूमिका बजावते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.












