- ट्रेलरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; चालक अटकेत…
सुरज करांडे, क्राईम रिपोर्टर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- निगडी येथील थरमॅक्स चौक परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रेलर चालकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १३) दुपारी साडेचारच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या नातेवाईक महिलेसह स्कुटीवरून भोसरीकडून निगडीच्या दिशेने जात होत्या. थरमॅक्स चौकातील सिग्नल ओलांडल्यानंतर काही अंतरावर मागून येणाऱ्या ट्रेलरने भरधाव वेगात व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत स्कुटीला डाव्या बाजूने जोराची धडक दिली.
या धडकेत स्कुटीस्वार महिला रस्त्यावर पडल्या. फिर्यादी महिलेला किरकोळ दुखापत झाली, मात्र स्कुटीवर पाठीमागे बसलेल्या महिलेवर ट्रेलरचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना गंभीर स्वरूपाच्या अंतर्गत दुखापती झाल्या असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर संबंधित ट्रेलर चालकाने जाणीवपूर्वक वैद्यकीय मदत न देता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तत्काळ तपास करून ट्रेलर चालकास अटक केली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे या चौकातील वाहतूक सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.












