- ओव्हरटेकच्या वादातून टोळक्याची अमानुष मारहाण..
- भररस्त्यावर हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता…
सुरज करांडे, क्राईम रिपोर्टर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- बोपखेल परिसरातील गणेशनगर कॉलनी येथे किरकोळ वाहतूक वादातून एका व्यक्तीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे बोपखेल परिसरात खळबळ उडाली असून, भररस्त्यावर अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पीडित व्यक्ती आपल्या स्कूटीवरून रामनगर येथून गणेशनगरकडे जात असताना काही जणांनी त्यांचा पाठलाग केला. “ओव्हरटेक कसा केला” या कारणावरून गणेशनगर कॉलनी येथील मुख्य रस्त्यावर, एका हॉट चिप्स दुकानासमोर स्कूटी अडवून वाद घालण्यात आला.
त्यानंतर २ ते ३ मोटारसायकलवर आलेल्या व्यक्तींनी शिवीगाळ करत लोखंडी कढई, लोखंडी हातोडा, सिमेंटची वीट तसेच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पीडित व्यक्तीच्या डोक्याला, छातीला, तोंडाच्या हनुवटीला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. आरोपींनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर जखमी व्यक्तीस तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तपास करून दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास दिघी पोलिसांकडून सुरू आहे.












