- जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे लवकरच उद्घाटन…
संतोष जराड :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, वकील व पक्षकार ज्या न्यायिक सुविधेची प्रतीक्षा करत होते, त्या जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे जानेवारी महिन्यात उद्घाटन होणार आहे. ही माहिती पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.
या नव्या न्यायालयांच्या स्थापनेमुळे फौजदारी आणि दिवाणी स्वरूपातील प्रकरणांसाठी नागरिकांना थेट पिंपरी-चिंचवडमध्येच न्याय मिळणार आहे. त्यामुळे न्यायप्रक्रियेला गती मिळणार असून नागरिकांसाठी ती अधिक सुलभ, सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारी ठरणार आहे. विशेषतः आतापर्यंत अनेक प्रकरणांसाठी पुणे येथे जावे लागत होते, ती अडचण मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, झपाट्याने होत असलेला औद्योगिक विस्तार आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेता स्वतंत्र जिल्हा व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाची आवश्यकता दीर्घकाळ जाणवत होती. या पार्श्वभूमीवर शहरातच न्यायालय सुरू होणे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या न्यायालयांसाठी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, माजी कार्यकारिणी सदस्य तसेच विद्यमान सदस्यांनी अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर शासनाकडून मंजुरी मिळून आता उद्घाटन होणार असल्याने वकील वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गौरव वाळुंज यांनी या न्यायिक सुविधेच्या स्थापनेमुळे शहराच्या न्यायव्यवस्थेला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.












