- ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; परिसरात हळहळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ जानेवारी २०२६) :- मकरसंक्रांतीच्या दिवशी काळेवाडीतील धनगरबाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वेगमर्यादा, वाहतूक नियंत्रण आणि पोलिस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळच्या सुमारास दोन्ही बहिणी दुचाकीवरून कामानिमित्त निघाल्या असताना हा अपघात घडला. धडकेनंतर दोघींनाही गंभीर दुखापत झाली होती. नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ऋतुजा आणि नेहा अशी मृत दोघींची नावे आहेत.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून अवजड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अपघातस्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.












