- संस्थेच्या माध्यमातून भव्य इमारत, अभ्यासिका आणि वधू-वर सूचक केंद्र व अन्नछत्र उभारणार – डॉ. बाबा कांबळे..
- आळंदी येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती सोहळा उत्साहात संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी वार्ताहर (दि. १४ फेब्रुवारी २०२६) :- समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संस्थान, श्री क्षेत्र आळंदी देवाची यांच्या वतीने राष्ट्रसंत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंती आज अत्यंत चैतन्यमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. या मंगलमयी निमित्ताने संगीत भजन, कीर्तन आणि मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे विशेष आयोजन करण्यात आले होते. संत रोहिदास महाराजांच्या समता, बंधुता आणि भक्तीच्या शिकवणीचा जागर या सोहळ्यात प्रकर्षाने पाहायला मिळाला.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप, आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, आळंदी नगर परिषदेचे गटनेते सचिन गिलबिले, नगरसेविका सौ. पुजाताई घुंडरे, नगरसेवक सोमनाथ कुऱ्हाडे, नगरसेवक गोविंद कुऱ्हाडे, नगरसेवक किरण येळवंडे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष रवींद्र खैरे, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती किसनराव गाडेकर, दिंडी क्र. २४ चे माजी अध्यक्ष बापू उगले व उपाध्यक्ष लताताई गाडेकर, संतोष पाचारणे, संतोष वाघमारे, उद्योजक शंकर वाघमारे, रामेश्वर पाचारे, विष्णु सातपुते, सागर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
-कार्यक्रमाचे अध्यक्षपद कष्टकऱ्यांचे नेते संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी भूषविले.
डॉ. बाबा कांबळे म्हणाले, “संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत. आळंदीमध्ये संस्थेची भव्य इमारत उभारण्याचे आमचे स्वप्न असून, त्यामध्ये ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक अभ्यासिका, अन्नछत्र, वधू-वर सूचक केंद्र आणि धार्मिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाईल.”
माजी मंत्री बबनराव घोलप म्हणाले, “संत रोहिदास महाराजांच्या क्रांतीकारी विचारांचा सन्मान आज केंद्र आणि राज्य सरकारकडून केला जात आहे. नाशिक येथे संत रोहिदास विद्यापीठासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, कुंभमेळ्यातही स्वतंत्र आखाड्याची निर्मिती करण्यात आली आहे, ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे.”
नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले, “आळंदी ही ज्ञानोबा-तुकोबांची पावन नगरी आहे. येथे सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करण्याची परंपरा आहे. संत रोहिदास महाराज भवन उभारण्याच्या संकल्पपूर्तीसाठी नगर परिषद सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करेल.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सुखदेव सूर्यवंशी, खजिनदार मधुरा डांगे, सहखजिनदार नारायण कोकाटे, सहसचिव प्रकाश यशवंते, विश्वस्त दत्तात्रय शिंदे, राजेंद्र सोनवणे, मारुती ढवळे, भाऊ काळे, स्वीकृत सदस्य सुदाम कांबळे, व्यवस्थापक नारायण गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी समाजबांधव, वारकरी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, आळंदी नगरपालिका फेरीवाला समितीचे सदस्य मंचक यादव, महेश कदम, सुनिता ठुबे, महेश जाधव, राहुल कुऱ्हाडे, शरद मुसळे आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत जिल्हाध्यक्ष संतोष नाना गुंड, जिल्हा उपाध्यक्ष सुरज सोनवणे यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना कार्याध्यक्ष अनिल सातपुते यांनी केली, तर सूत्रसंचालन विश्वस्त, तुषार नेटके यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे आभार सचिव ह.भ.प. बाळासाहेब चव्हाण यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.












