न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ प्रतिनिधी (दि. १४ फेब्रुवारी २०२६) :- लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ लायन्स पॉइंट येथे पुन्हा एकदा आत्महत्येची दुर्दैवी घटना घडली आहे. वीरेंद्र सिन्हा (वय ३२, रा. बाणेर, पुणे) या आयटी अभियंत्याने दरीत उडी घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्ग रेस्क्यू टीमने दरीत शोधमोहीम राबवली. सुमारे २५० फूट खोल दरीत उतरून बचाव पथकाने शोध घेतला असता संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला. मोठ्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी लायन्स पॉइंट परिसरात एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे निदर्शनास आले होते. चौकशीत हे वाहन वीरेंद्र सिन्हा यांचे असल्याचे समोर आले. संबंधित तरुण पुण्यातील एका आयटी कंपनीत कार्यरत होता. पहाटेच्या सुमारास त्यांनी पत्नी आणि मित्राला संदेश पाठविल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
शोधमोहीमेदरम्यान योगेश उंबरे, महेश मसने, आयुष वर्तक, आयुष पवार, देवश्री चिले, सचिन गायकवाड, कुणाल कडू, कपिल दळवी, योगेश दळवी, सागर दळवी, सागर कुंभार, अनिल आंद्रे, गणेश भांगरे, पिंटू मानकर, महादेव भवार, गणेश म्हसकर, ज्ञानेश्वर आखाडे, संतोष मरगळे, चंद्रकांत गाडे, आनंद गावडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
अलिकडच्या काळात लायन्स पॉइंट येथे आत्महत्यांच्या घटना वाढताना दिसत आहेत. मागील पंधरा दिवसांत याठिकाणी दोन जणांनी जीवन संपविले आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. लोणावळा शहरापासून काही अंतरावर असलेले हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ भविष्यात प्रस्तावित ग्लास स्कायवॉक प्रकल्पामुळे जागतिक स्तरावर ओळख मिळविण्याच्या मार्गावर आहे. मात्र, वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे येथे सुरक्षेच्या कडक उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.












