- पालकांनी फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन…
- पैसे मागणाऱ्यांवर कारवाईचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ मे २०२६) :- आर.टी.ई. अंतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया शासन नियमांनुसार पूर्णपणे पारदर्शक, ऑनलाइन व विनामूल्य राबविण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली. अर्ज, कागदपत्र पडताळणी, संगणकीय लॉटरी व प्रवेश निश्चिती हे सर्व टप्पे अधिकृत पोर्टलवरूनच होतात. अलीकडे काही ठिकाणी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याचे प्रकार समोर आल्याने प्रशासनाने पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
महापौर रवी लांडगे यांनी शिक्षण हा मुलांचा अधिकार असून कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी जोडलेला नसल्याचे स्पष्ट केले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रवेशासाठी पैसे मागणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले. उपायुक्त ममता शिंदे यांनीही प्रक्रिया पूर्णतः संगणकीकृत असल्याचे नमूद केले.
पालकांनी कोणत्याही एजंटवर विश्वास ठेवू नये, अधिकृत पोर्टलवरूनच अर्ज करावा व संशयास्पद प्रकार आढळल्यास तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.













