- माजी महापौरांच्या वक्तव्याने खळबळ..
- २०१४ मधील विलास लांडे यांच्या पराभवावरून नव्या चर्चांना उधाण…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 20 मे 2026) :- स्वर्गीय अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले, वाढवले आणि शहराच्या राजकारणात अनेकांना मोठी ओळख मिळवून दिली. राज्याच्या राजकारणापासून ते गावखेड्यापर्यंत प्रभाव निर्माण करताना त्यांनी असंख्य पदाधिकारी घडवले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर बाहेरून आलेल्यांसह शहरातील भूमिपुत्रांनाही मोठमोठ्या पदांवर संधी देत त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र, त्याच पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी सोयीचे राजकारण करत अजितदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विलास लांडे यांचा पराभव करण्यासाठी मागील पंधरा वर्षांपासून कशाप्रकारे राजकीय षड्यंत्र रचले गेले, याबाबत माजी महापौर मंगला कदम यांनी आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत केलेल्या वक्तव्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या वक्तव्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील जुने अंतर्गत मतभेद, गटबाजी आणि राजकीय विश्वासघात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन राजकारणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘पॉवर सेंटर’
२०१४ पूर्वी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात स्व. लक्ष्मणभाऊ जगताप आणि माजी आमदार विलास लांडे ही दोनच केंद्रस्थानी असलेली नावे मानली जात होती. स्व. अजित पवार यांनी या दोन्ही नेत्यांवर मोठा विश्वास ठेवत त्यांना व्यापक अधिकार दिले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर महापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेता, गटनेता तसेच विविध समित्यांवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकारही प्रामुख्याने याच नेत्यांकडे होते. त्या काळात ‘शहराबाहेरचे’ आणि ‘भूमीपुत्र’ असा वाद वारंवार निर्माण होत होता. मात्र, हा वाद बाजूला सारत अजितदादांनी माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, वैशाली घोडेकर, मोहिनी लांडे, माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, तसेच विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यासह अनेकांना मोठ्या पदांवर संधी दिली.
राजकीय विश्वासघात ? २०१४ च्या पराभवाची चर्चा
तत्कालीन आमदार विलास लांडे यांनी भविष्यात हेच पदाधिकारी आपल्यासाठी राजकीय आव्हान ठरू शकतात, असा विचार न करता या सर्व नावांना पाठिंबा दिला. अजितदादांचा आदेश अंतिम मानत त्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यावरच अधिक भर दिला. मात्र, कालांतराने हेच पदाधिकारी विलास लांडे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि वैरी बनत गेल्याची बाब त्यांच्या लक्षात आली नाही. अखेर त्याचाच मोठा फटका त्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बसल्याची चर्चा आजही राजकीय वर्तुळात रंगताना दिसते.
अजितदादांच्या विश्वासाला तडा ?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यभर भाजपची लाट असताना चिंचवडचे तत्कालीन आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व आणि मतदारसंघावरील पकड कायम ठेवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, दुसरीकडे विलास लांडे यांनी कोणताही राजकीय पर्याय न निवडता राष्ट्रवादी काँग्रेससोबत निष्ठा कायम ठेवली. त्या काळात अजित पवार यांनी पक्षांतर्गत मोठा विरोध डावलून महेश लांडगे यांना महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष पद दिले होते. तरीही लांडगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून विलास लांडे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर लांडगे यांनी राष्ट्रवादीतील लांडेविरोधकांची मोट बांधत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तिथेच अजितदादांच्या विश्वासाला तडा गेल्याचे भोसरीतील राष्ट्रवादी समर्थक बोलू लागले आहेत.
ज्यांना मोठं केलं, त्यांनीच केला घात ?
या संपूर्ण राजकीय घडामोडीत माजी महापौर मंगला कदम यांचाही सहभाग होता, हे आता त्यांच्या स्वतःच्या वक्तव्यामुळे उघड झाल्याची चर्चा रंगली आहे. एका अनधिकृत बांधकामावरील कारवाईदरम्यान व्यक्त झालेल्या संतापातून कदम यांच्या मनातील भावना उफाळून आल्याचे बोलले जात आहे. आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत त्यांनी, “हे बांधकाम करताना मी तुम्हाला विचारलं होतं की नाही? तुम्ही ‘बांधा’ म्हटल्यानंतरच ते सुरू केलं. महेशदादा, विलास लांडे यांना पाडण्यासाठी मागील पंधरा वर्षे मी तुमचे काम केले,” असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे ज्यांना मोठं केलं, त्यांनीच 2014 मध्ये अजितदादा यांच्यासोबत गद्दारी करुन राष्ट्रवादीचा विश्वासघात केल्याची चर्चा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.
राष्ट्रवादीतील अंतर्गत फितुरीचा पर्दाफाश ?
या वक्तव्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात पडद्यामागून काम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फितुरी झाली होती का, याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. तसेच विलास लांडे यांच्या पराभवासाठी पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी सक्रिय भूमिका बजावल्याचे स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे “हा अजितदादांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचाच प्रकार नव्हे काय?” असा सवाल आता शहरातील नागरिक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. मंगला कदम यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन राष्ट्रवादीतील अंतर्गत फितुरीचा पर्दाफाश झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.













