- लेखापाल प्रविण जैन जबाबदार असल्याचा अहवालात ठपका..
- एफडीवरील व्याजदरातील तफावतीसही जैन जबाबदार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सुमारे ६० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल अखेर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी महापौर रवि लांडगे यांना सादर केला. या अहवालात लेखापाल प्रविण जैन यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून, त्यांनाच या प्रकरणासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. तसेच बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरातील तफावतीसही जैन जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संबंधित अहवाल महापौरांकडे प्रत्यक्ष सादर करण्यात उशीर झाल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याबाबत ‘न्यूज पीसीएमसी’ने “६० कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा अहवाल अद्याप महापौरांकडे आलाच नाही” या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाल करत मंगळवारी हा अहवाल महापौरांना सादर केला.
यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे आणि नगरसेवक उत्तम केंदळे उपस्थित होते.
महापौर लांडगे म्हणाले की, २४ मार्चच्या अर्थसंकल्पीय बैठकीत बोगस उपसूचनांचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली. काम न करता बिले दिली असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. शासनाचे पत्र प्राप्त होताच लेखापालावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले, लेखापालांनी केलेला घोटाळा आज सिद्ध झाला आहे. बोगस उपसूचनांचा आधार घेत बिलं वाटप केली. एफडी प्रकरणात देखील महापालिकेचं आर्थिक नुकसान केलं आहे. ठराविक बँकेला समोर ठेऊन गुंतवणूक केली. त्याचा ताळमेळ बसत नाही. यात केफोची चूक दिसत आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला असून १४ उपसूचनांच्या आधारे बिलांची अदायगी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात केफोवरही कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.














