न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ मे २०२६) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ यांनी माजी महापौर मंगलाताई कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
सोमवारी मंगलाताई कदम यांचा एक कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्यांनी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी काम केल्याची अप्रत्यक्ष कबुली दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी आपल्या मुलाला भाजपची उमेदवारी मिळवून देत जाहीर प्रचार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षविरोधी कारवायांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.














