न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- पुणे महापालिकेच्या धोरणानुसारच पिं. चिं महापालिकेनेही मॉल, मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग निःशुल्क करावे, अशी मागणी शहर मनसे अध्यक्ष सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, सचिव रुपेश पटेकर, महिला सचिव सीमा बेलापुरकर, उपाध्यक्ष चंद्रकांत दानवले, राजु सावळे, विभाग अध्यक्ष प्रतीक शिंदे, मयूर चिंचवडे, उपविभाग अध्यक्ष सुरेश सकट व आदी उपस्थित होते.
यात त्यांनी म्हटले आहे की, ”पिंपरी चिंचवड शहरामध्ये मॉल, मल्टीप्लेक्स, हॉस्पिटल, ईत्यादी ठिकाणी पार्किंग शुल्क १० रु. पासुन १०० रु पर्यंत आकारले जाते. अनेक संस्थानी यावर आवाज उठविला परंतु, त्यावर प्रशासनाने दुर्लक्ष केले. ही बाब आता न्यायालयात गेली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार आणि धोरणानुसार मॉल, मल्टिप्लेक्स याठिकाणी पार्किंग शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे.
पुणे शहर आणि परिसरात असलेल्या मॉल व मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क आकारण्यात येणार नाही, असा ठराव पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीमध्ये १४/६/२०१९ ला मंजुर करण्यात आला आहे. त्याच धोरणानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील परिसरातील मॉल, मल्टिप्लेक्स या ठिकाणी पार्किंग निःशुल्क करावे. हा निर्णय पुणे महापालिकेच्या अनुषंगाने घ्यावा, असे चिखले यांनी या निवेदनात म्हटले आहे.