न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- विविध स्पर्धा व भरती परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांवरून पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन केंद्र व राज्य सरकारवर तीव्र टीका केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी, “भाजप सरकारने शिक्षण व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे,” असा आरोप केला.
देशातील NEET, महाराष्ट्रातील TET, राजस्थानमधील पॅरामेडिकल परीक्षा तसेच विविध भरती परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी या प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.
शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी, “पेपर फुटतो, विश्वास तुटतो. सरकारच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या भवितव्याचा व्यापार केला जात आहे,” असा आरोप केला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. पत्रकार परिषदेला काँग्रेस व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
















