न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात संपन्न झाली. यावेळी विविध महत्वपूर्ण विषयांना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महानगरपालिकेस मंजूर झालेल्या ५ कोटी निधीतून मराठी शाळांच्या दर्जोन्नतीसाठी तसेच आरोग्य साहित्य, महिलांसाठी आरोग्यविषय साहित्य,पर्यावरण व पर्यटनासाठी निधी वापरण्यात येणार असल्याचे सभापती बारणे यांनी सांगितले. याशिवाय मंजूर करण्यात आलेल्या विविध विषयांमध्ये शहराची आरोग्य व्यवस्था बळकट करणे, दिव्यांग व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, कचरा व शौचालय व्यवस्थापन, तसेच अग्निशामक यंत्रणा सज्ज करणे यांसारख्या कामांचा समावेश आहे.
आज झालेल्या बैठकीस आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे,नगरसचिव मुकेश कोळप तसेच स्थायी समितीचे सदस्य आणि महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रुग्णालयांसाठी आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आवश्यक औषधे, उपभोग्य वस्तू आणि ऑर्थोपेडिक साहित्य खरेदीस मंजुरी. तसेच विविध प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यास मंजूरी देण्यात आली.
औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी अंतर्गत MS-CIT उपकेंद्रांना मान्यता. याद्वारे महिला, अनुसूचित जाती/जमाती आणि भटक्या जमातीतील लाभार्थ्यांना १०% शुल्कात, तर ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना केवळ ५% शुल्कात संगणक प्रशिक्षणाची सुविधा मिळणार आहेत.
झोपडपट्टी भागातील सेवाशुल्क बिले वाटप आणि जनजागृतीचे काम महिला बचत गटांना देण्यात आले आहे, ज्यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच, प्रभाग २० मधील सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाईच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली.
रावेत येथील एक्सप्रेस फिडरवर अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसवणे, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जलनिःसारण (ड्रेनेज) कामे आणि सांगवी स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीची देखभाल दुरुस्ती या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
शहरातील जलशुद्धीकरण केंद्र व पंप हाऊस येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक अग्निशामक उपकरणे बसवण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे स्थायी समितीने या निर्णयांद्वारे स्पष्ट केले आहे. स्थायी समितीच्या या बैठकीत घेतलेले निर्णय अत्यंत स्वागतार्ह आणि सर्वसमावेशक आहेत. विशेषतः आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत क्षेत्रांवर दिलेला भर शहराच्या विकासाची दिशा अधोरेखित करतो,औषध खरेदी आणि ५ कोटींच्या निधीतून शाळांची दर्जोन्नती यामुळे सामान्य नागरिकांना प्रत्यक्ष फायदा होणार आहे. तसेच, महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी देणे आणि दिव्यांग व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणात सवलत देऊन सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन जपला आहे. कोणतीही प्रलंबित कामे न ठेवता, जनहिताचे हे विषय मार्गी लावून दाखवलेली प्रशासकीय तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे. या निर्णयांची अंमलबजावणी वेळेत झाल्यास पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर पडेल.
– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.
















