न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०१ जुलै २०२६) :-पुणे महानगरपालिकेच्या वृक्षगणना प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेबाबत आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाकडे सविस्तर माहिती मागितली.
यापूर्वी मिळकत कर सर्वेक्षणातील त्रुटींमुळे दंडात्मक कारवाई झालेल्या कंपनीलाच सुमारे ३० कोटी रुपयांचे वृक्षगणनेचे कंत्राट देण्यात आल्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण मागितले.
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मिळकत कर सर्वेक्षण आणि वृक्षगणना ही वेगवेगळ्या कालावधीतील कामे असल्याचे स्पष्ट केले. संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई झाली असली तरी त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देत वृक्षगणनेची निविदा प्रक्रिया सर्व नियम, अटी आणि मंजुरीनंतरच पूर्ण करण्यात आल्याचे स्पष्ट केले. सार्वजनिक कामांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे अमित गोरखे यांनी यावेळी अधोरेखित केले.















