न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी वारी-२०२६ पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मंगळवारी देहू येथील मंदिर परिसर तसेच संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी केली. ७ जुलै रोजी होणारा पालखी सोहळा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
मंदिर संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे महाराज व विश्वस्तांशी चर्चा करून गर्दी व्यवस्थापन, कायदा-सुव्यवस्था आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत नियोजनाचा आढावा घेण्यात आला. दर्शनबारीत योग्य बॅरिकेडिंग, दोरखंडांचा वापर तसेच नव्याने तयार होत असलेल्या पालखी रथाचीही पाहणी करण्यात आली.
भक्तीशक्ती चौक ते मोरवाडी चौकादरम्यान सुरू असलेल्या मेट्रो कामामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांची पाहणी करून मेट्रो अधिकाऱ्यांना बॅरिकेडिंग मागे घेणे, संरक्षक जाळ्या बसविणे, राडारोडा हटवून रस्ता समतल करणे अशा सूचना देण्यात आल्या. महापालिकेलाही झाडांच्या फांद्या छाटणे, अडथळा ठरणाऱ्या कमानी हटविणे आणि पालखी मार्ग अधिक रुंद व सुरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाहणीवेळी पोलीस, महापालिका आणि महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
















