- आयुक्त, प्रकल्प अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – सुषमा अंधारे..
- ‘पाच लाखांची मदत देऊन तोंड बंद होणार नाही; शिवसेना न्यायालयीन लढाई लढणार’…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ जुलै २०२६) :- मोशी येथील कचरा डेपो दुर्घटना ही नैसर्गिक नसून मानवनिर्मित दुर्घटना आहे. अवघ्या अकरा महिन्यांत इमारत कोसळली म्हणजे बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. या दुर्घटनेप्रकरणी महापालिका आयुक्त आणि संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. चिंचवड येथे रविवारी (दि. १२) दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत अंधारे बोलत होत्या. यावेळी शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख चेतन पवार उपस्थित होते.
अंधारे म्हणाल्या, “अवघ्या अकरा महिन्यांत इमारत कोसळते, याचा अर्थ बांधकाम निकृष्ट होते का, याची चौकशी झाली पाहिजे. प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी कुठे आहेत? या प्रकल्पाला नेमका कुणाचा वरदहस्त आहे? संबंधित यंत्रणा एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? दुर्घटनेतील संपूर्ण माहिती आणि संबंधितांची यादी प्रशासनाने जाहीर केली पाहिजे.”
घनकचरा प्रकल्पातील चिमणी पर्यावरण दिनाच्या दिवशी कोसळल्यानंतरही महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. प्रकल्पालगत खदान असून तेथे ब्लास्टिंग होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. संरक्षक भिंतीचा अभाव तसेच कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या मिथेनसारख्या वायूंमुळे नागरिक आणि कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे अंधारे म्हणाल्या.
“दुर्घटनेनंतर नातेवाईक आपल्या माणसांच्या सुखरूप परतण्याची वाट पाहत होते. मात्र प्रशासनाकडून अपेक्षित संवेदनशीलता दिसली नाही. दुर्घटनेची स्पष्ट आणि अधिकृत माहिती वेळेत का देण्यात आली नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अँटनी लॉरा कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली पाच ते दहा लाख रुपयांची मदत तुटपुंजी असल्याचे सांगत मृत कामगारांना पीएफसह अन्य कायदेशीर लाभ मिळत होते का, याची चौकशी करण्याची मागणी अंधारे यांनी केली. “पाच लाख रुपये देऊन लोकांची तोंडे बंद होतील, असे कुणी समजू नये. दोन दिवसांनी आम्ही पुन्हा या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत. आवश्यकता भासल्यास संबंधितांना न्यायालयात खेचू. शिवसेना सर्व ताकदीने न्यायालयीन लढाई लढेल,” असा इशारा त्यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवरही अंधारे यांनी जोरदार टीका केली. “हा जात किंवा धर्माचा विषय नसल्याने सरकारचे अपेक्षित लक्ष दिसत नाही. अन्यथा संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असती,” असा आरोप त्यांनी केला. पर्यावरण मंत्री तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित मंत्री घटनास्थळी आले नसल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सफाई कर्मचारी आयोगानेही या दुर्घटनेची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
“या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना (उबाठा) शांत बसणार नाही. दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असे अंधारे यांनी स्पष्ट केले.

















