- वराळे येथून जबरदस्तीने कारमध्ये बसवून स्मशानभूमीकडे नेले; तरुणाचे दोन्ही डोळे सुजले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव मावळ (दि. ११ जुलै २०२६) :- जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेऊन मारहाण केल्याची घटना वराळे येथे घडली. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास डी. वाय. पाटील कॉलेजच्या गेटसमोर आरोपींनी फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून माळवाडी येथील स्मशानभूमीकडे नेले. तेथे पुन्हा तोंडावर तसेच हातापायांवर मारहाण करून सुमारे अर्धा ते पाऊण तास डांबून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मारहाणीत फिर्यादीचे दोन्ही डोळे सुजले आहेत. सुधर्म चव्हाण, वेदांत वाळंजकर, सुशांत नगीने आणि ऋषिकेश बदले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक रेळेकर तपास करीत आहेत.

















