- आठ जणांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० जुलै २०२६) :- सायबर फसवणुकीसाठी बनावट किंवा संशयास्पद बँक खाती उघडून देशभरातील नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पिंपरी, सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यांत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींनी विविध बँक खात्यांद्वारे लाखो रुपयांचे व्यवहार केल्याचे तपासात उघड झाले आहे.
पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अक्षय हेमंत गायकवाड (वय ३३, रा. पिंपरी गाव) याने *द कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे* खाते उघडून साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे. या खात्यावर १९ हजार १०० रुपयांचे व्यवहार झाल्याचे आणि देशातील दोन नागरिकांकडून ही रक्कम फसवणुकीद्वारे जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सांगवी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यात सुजल संताजी माने या नावाने आयडीएफसी बँकेचे खाते उघडून सायबर गुन्हेगारांना मदत केल्याचा आरोप आहे. या खात्यावर तब्बल २ लाख ७५ हजार रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले असून देशातील दोन नागरिकांकडून सुमारे २ लाख ४९ हजार ८५४ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाकड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आणखी एका प्रकरणात विकास गजानन भुजबळ (रा. पिंपळे निलख) याने इतर साथीदारांसह आयडीएफसी फर्स्ट बँकेचे खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारीसाठी वापरल्याचा आरोप आहे. या खात्यावर तब्बल ८ लाख ८८ हजार ३८२ रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे आढळले असून देशभरातील चार नागरिकांची एकूण १ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, कट रचणे, संघटित गुन्हेगारी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे आर्थिक व्यवहार आणि त्यामागील इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी करीत आहेत.

















